पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. गुरुवारी (दि.२२) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत पुणे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (खुल्या) महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यात महिला महापौर होणार हे निश्चित झाले असून, आता नेमकी महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. पुणे महापालिकेसह राज्यातील सर्व २९ महापालिकांचे आरक्षण चित्र आज स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात नावांची चर्चा रंगू लागली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ११९ जागांसह निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, आरक्षण सोडतीनंतर कोणत्या महिला नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी अनेक वेळा एससी महिला किंवा ओबीसी पुरुष आरक्षणाची चर्चा होती; मात्र यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
सन २०१७ मध्ये भाजपने प्रथमच पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवली होती. यंदा मात्र दोन तृतीयांश बहुमतासह भाजपने घवघवीत विजय मिळवला आहे. त्यामुळे अनुभवी तसेच नवोदित अशा अनेक महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत आहेत.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्याला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारीपर्यंत नवनिर्वाचित सभागृह अस्तित्वात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वी दिली होती. आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ५ फेब्रुवारीपूर्वीच पुण्याला नवा महिला महापौर मिळण्याची दाट शक्यता आहे.
पुण्यातून चर्चेत असलेली संभाव्य नावे
रंजना टिळेकर – प्रभाग क्र. ४० (कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी) मधून विजयी; शिवसेना ठाकरे गटाचे रुपेश मोरे यांचा पराभव.
रोहिणी चिमटे – प्रभाग क्र. २९ (खराडी–मांजरी बुद्रुक) मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या.
मंजुषा नागपुरे – अनुभवी नेत्या; सिंहगड रोड परिसरात मजबूत जनसंपर्क, बिनविरोध निवड.
वीणा घोष – प्रभाग क्र. ३६ (धायरी–नऱ्हे) मधून भाजपच्या तिकीटावर विजयी.
प्राची आल्हाट – प्रभाग क्र. ४१ (महंमदवाडी–कौसरबाग) मधून निवड.
मृणाल कांबळे – प्रभाग क्र. २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) मधून विजयी; इंदिरा बागवे यांचा पराभव.
वर्षा तापकीर – धनकवडी–कात्रज डेअरी, प्रभाग क्र. ३७(ब) मधून निवड.
मानसी मनोज देशपांडे – प्रभाग क्र. २०(क) शंकर महाराज मठ, बिबवेवाडी येथून निवड.
महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने पुण्यात महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून, शहराच्या कारभाराची सूत्रे कोणत्या महिलेकडे जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.