पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेदरम्यान कोणतीही आकस्मिक परिस्थिती हाताळण्याकरिता युसीआयच्या मानकांचे पालन करुन सायकलपटूंच्या आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टीने त्वरित वैद्यकीय मदतीकरिता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक ८ किमीवर एक वैद्यकीय पथक त्यामध्ये रुग्णवाहिका, प्रथमोपचार संच, आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ (ईएमटी), प्रत्येक २५-३० किमीवर एक प्रगत जीवनरक्षक सेवा (एएलस) अतिदक्षता विभाग (आयसीयु) मोबाईल युनिट (डॉक्टर आणि सुसज्ज उपकरणासहित विभाग) तैनात आहेत. प्रत्येक मार्गाच्या सुरुवात आणि शेवटच्या ठिकाणी मेडीकल बेस कॅम्प उभारण्यात आले आहेत. डोंगराळ व घनदाट क्षेत्रात प्रत्येक ५ किमीवर वैद्यकीय पथक उपलब्ध करण्यासोबत प्रत्येक मार्गावर २०-२५ कि.मी. त्रिज्येतील शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये समन्वय साधत कार्यवाही करण्यात येत आहे.
डोंगराळ व घनदाट क्षेत्रात घाट, वळण, चढाव, पूल तसेच गर्दीच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेच्या स्वरूपात वैद्यकीय पथके तैनात आहेत. नदी व ओढ्यांच्या मार्गावर आपदा मित्राची नियुक्ती करण्यात आली आहेत. रुग्णवाहिका, १०८ रुग्णवाहिका वैद्यकीय सुविधांनीयुक्त सुसज्ज असून या सर्व वाहनांमध्ये जीपीएस व वॉकी-टॉकीसह ट्रॅकिंग यंत्रणा उपलब्ध आहेत. आरोग्य सेवा २४ X ७ सुसज्ज स्थितीत, आपत्कालिन प्रतिसादाकरिता आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक (इएमआर) नियंत्रण कक्षाद्वारे समन्वय साधण्यात येत आहे. अतिदक्षता विभाग (आयसीयु) सुविधा, ट्रॉमा केअर, क्रीडा दुखापत उपचार विभाग (स्पोर्ट्स इन्ज्युरी युनिट) असलेल्या रुग्णालयांना स्तर-१ आपत्कालिन रुग्णालय म्हणून नामनिर्देशित, तसेच उर्वरित रुग्णालयांना स्तर-२, सहाय्यक उपचार विभाग म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत.
१०८ रुग्णवाहिका सेवा आणि खाजगी रुग्णवाहिकांमध्ये समन्वय साधण्यासह प्रत्येक मार्गावर किमान २ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. त्या १०८ नियंत्रण कक्षाशी थेट लाईनद्वारे जोडण्यात आल्या आहेत. आपत्कालीन आरोग्य सेवा करिता असलेल्या वाहनांमध्ये ट्रॅक क्रमांक, स्थळ, रेस आदी माहिती अपलोड करण्यात येत आहे. गंभीर रुग्णाकरिता प्रगत जीवनरक्षक सेवा (एएलएस) आणि प्रथमोपचारासाठी मूलभूत जीवनरक्षक सेवा (बीएलएस) तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन अतिरिक्त रुग्णवाहिका पर्यायी तैनात करण्यात आल्या आहेत.
संभाव्य आपत्कालीन परिस्थितीची माहिती त्वरित संबंधित यंत्रणांना देण्यासाठी मार्गालगतच्या रुग्णालयांमध्ये पूर्व सूचना कक्ष, स्पर्धाकालीन रुग्णांना तातडीने प्राधान्य देण्याकरिता रुग्णालयात रुग्ण प्रवेश कक्ष राखीव ठेवण्यासह सर्व वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व रुग्णालयांमधील समन्वयासाठी आरोग्य आदेश व समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. लाईव्ह डॅशबोर्ड व मोबाइल ॲप रेडिओ ट्रॅकिंग सिस्टीमची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व रुग्णालये, वैद्यकीय पथके व १०८ सेवा कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्या मार्गदर्शन केले आहे.
युसीआयच्या मानकांनुसार औषधे, ड्रेसिंग साहित्य, प्रथमोपचार संच, आपत्कालिक संच, स्ट्रेचर, बँडेज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ट्रॉमा किटमध्ये रक्तस्राव नियंत्रण, टॉर्निकेट, हीमॉस्टॅटिक एजंट, कंप्रेस्ड गॉझ, ट्रॉमा ड्रेसिंग गॉझ रोल्स, श्वसन मार्ग व्यवस्थापनाकरिता सीपीआर मास्क, नासोफॅरिन्जियल एयरवे किंवा ओरॉफॅरिन्जियल एयरवे, इतर आवश्यक साहित्य, ट्रॉमा शियर्स, चेस्ट सील्स, आपत्कालीन ब्लँकेट, हँड ग्लोव्हज, एंटिसेप्टिक वाइप्स/सोल्यूशन, ड्रेसिंग किंवा बँडेज सुरक्षित करण्यासाठी टेप, बर्न ड्रेसिंग, आय वॉश, स्प्लिंट्स, फर्स्ट एड मॅन्युअल, गाइड, वैयक्तिक संरक्षण सामग्री, औषधे, वेदनाशामक अँटीहिस्टामाईन्स, वैयक्तिक औषधे, वैयक्तिक माहिती एलर्जी, वैद्यकीय स्थिती, आपत्कालीन संपर्क माहिती, स्वच्छतेकरिता हँड सॅनिटायझर, वाइप्स, साधनांमध्ये टुईझर्स, सेफ्टी पिन्स, पेनलाईट, बायोहझर्ड बॅग्स आहेत.
प्राथमिक उपचार पेटीमध्ये जखम उपचार साहित्य, ॲडेसिव्ह बँडेज (पट्ट्या), गॉज पॅड, मेडिकल टेप, अँटिसेप्टिक वाइप्स,द्रावण, चिमटा, कात्री, इलॅस्टिक बँडेज, निर्जंतुक सलाईन द्रावण तसेच वेदनाशामक व इतर आवश्यक साहित्यामध्ये वेदनाशामक आणि अँटीहिस्टामिन औषधे, अँटिसेप्टिक मलम, इन्स्टंट कोल्ड, थर्मामीटर, डिस्पोजेबल हातमोजे, प्राथमिक उपचार मार्गदर्शक पुस्तिका आणि ऐच्छिक (परंतु उपयुक्त) साहित्यामध्ये इमर्जन्सी ब्लँकेट, सीपीआर मास्क, बर्न क्रीम, हायड्रोकॉर्टिसोन क्रीम, अँटॅसिड गोळ्या, एपिनेफ्रिन ऑटो-इंजेक्टर समावेश करण्यात आला आहे.