मुंबई : कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड झाल्याबद्दल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शेती, रेशीम उत्पादन, कापूस संशोधन तसेच पशुपालन व दुग्धव्यवसाय या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाल्याचे भरणे यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील शेतकरी व पशुपालकांचा या यादीत समावेश असून त्यांच्या कार्यामुळे देशभरातील शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळत आहे.
महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी आणि कृषी नवोन्मेषक श्रीरंग देवाबा लाड यांची पद्म पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. ‘दादा लाड कापूस तंत्र’ विकसित करून त्यांनी कापूस उत्पादनात क्रांतिकारी बदल घडवून आणला. या तंत्रज्ञानामुळे बियाणे कापसाचे उत्पादन सुमारे ३०० टक्क्यांनी वाढले असून हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न ४० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेती हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य उद्देश राहिला आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी गावचे रहिवासी रघुपत सिंग यांची शेती क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शेतीतील जैवविविधता जपण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ५५ पेक्षा अधिक भाजीपाला पिकांचे जतन, बियाण्यांचे संवर्धन तसेच १०० हून अधिक नवीन वनस्पती आणि पिकांच्या जाती विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
आसाममधील प्रसिद्ध रेशीम शेतकरी जोगेश देउरी यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मुगा रेशीम उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. नैसर्गिक सोनेरी झळाळी, टिकाऊपणा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेमुळे ओळखला जाणारा मुगा रेशीम आज आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.तेलंगणातील प्रसिद्ध पशुपालक रामा रेड्डी मामिदी यांना पशुपालन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यामुळे दुग्धव्यवसायाचे आधुनिकीकरण झाले असून अनेक शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा आधार मिळाला आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “शेती, पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणे ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत झाली असून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. परभणी येथील शेतकरी श्रीरंग देवाबा लाड यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष आनंदाची गोष्ट आहे.”दरम्यान, पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. दरवर्षी राष्ट्रपती भवनात आयोजित औपचारिक समारंभात भारताचे राष्ट्रपती हे पुरस्कार प्रदान करतात.