उरण : प्रजासत्ताक दिनाच्या पावन निमित्ताने उरण पोलीस विभागाच्या सहकार्याने उरण पोलीस स्टेशन येथे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेले दार्शनिक दृष्टीकोनातून काम करणारे दर्शन नाईक व त्यांच्या व्यसनमुक्ती समुदायातील काही सहकारी सहभागी झाले होते.या प्रसंगी दर्शन नाईक यांनी उरण परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपानाचे व्यसन तसेच स्क्रीन (मोबाईल/डिजिटल) व्यसन याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या व्यसनांचा युवकांवर, कुटुंबव्यवस्थेवर आणि सामाजिक सुरक्षिततेवर होणारा परिणाम त्यांनी सविस्तरपणे मांडला.
कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना Alcoholics Anonymous (AA) आणि Narcotics Anonymous (NA) यांसारख्या स्वयं-सहाय्य गटांची माहिती देण्यात आली.
व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेली मदत, बैठकींची रचना, गोपनीयता, तसेच गरजूंना योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करता येईल याबाबत उपयुक्त माहिती व दृष्टिकोन देण्यात आला.हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच संपूर्ण उरण पोलीस विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल व सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले.अशा प्रकारचे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यास व प्रतिबंधात्मक उपाययोजना बळकट करण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.