भंडारा : प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध आजही जीवघेणा ठरत असल्याचं भंडारा जिल्ह्यातील बेटाळा गावातील धक्कादायक घटनेतून समोर आलं आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच युवकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, सासू आणि मेहुण्याने केवळ 6 हजार रुपयांची सुपारी देत जावयाचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
आकाश शेंडे (वय 24) असं मृत युवकाचं नाव आहे. आकाशने कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता गावातीलच तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे नवदांपत्य बेटाळा गावात राहत होतं. मुलीच्या आईला आणि भावाला हे नातं मान्य नसल्याने त्यांनी दोघांचा काटा काढण्याचा कट रचला.
त्यानुसार आरोपींनी सुपारी देत आकाशची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह गावालगतच्या नाल्यात टाकून हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मोहाडी पोलिसांनी संशयावरून सखोल तपास केला असता ही आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचं स्पष्ट झालं.
या प्रकरणी मृतकाची सासू अंजू कुंभलकर (43), मेहुणा चेतन कुंभलकर (23) यांच्यासह भारत मोहतुरे (26), महेंद्र बोरकर (31) आणि दिनेश उर्फ सचिन ईश्वरकर (37) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील कथेसारखीच ही घटना असून, ऑनर किलिंगसारखे प्रकार आजही समाजात घडत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.