बारामती : बारामती विमानतळावर आज सकाळी लँडिंगदरम्यान एक खासगी विमान धावपट्टीवरून घसरून शेजारील शेतात आदळल्याची गंभीर घटना घडली. अपघातानंतर विमानाला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे येणारे हे खासगी विमान सकाळी ९ ते ९:१५ दरम्यान लँडिंगच्या प्रयत्नात होते. याचवेळी तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवर नियंत्रणात न राहता बाजूला घसरले आणि शेतात जाऊन आदळले. अपघातानंतर क्षणार्धात विमानाने पेट घेतला. घटनास्थळी धुराचे मोठे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. विमानात किती प्रवासी होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून प्रशासनाकडून पुढील तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.
या घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण राज्यात मोठी चर्चा सुरू असून राजकीय वर्तुळाचे लक्ष या दुर्घटनेकडे लागले आहे.