मुंबई : दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! … तुम्ही जीवाला चटका लावून गेलात… तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय आणि अॅकडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. तुमच्या भाषणातून, विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं.. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं..असा अनुभवी नेता होणे नाही .. महाराष्ट्र एका डायनॉमिक नेत्याला मुकला.. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आदरांजली, अशा शब्दांत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल झालेल्या पंकजा मुंडे यांनी अजित दादांना भावपूर्ण शब्दांत आदरांजली वाहिली.
श्रीमती मुंडे म्हणाल्या की, अजितदादांनी आपल्या कामाने, आपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता. राजकारणात शब्दांला जागणारे म्हणून सर्वांनाच ते परिचत होते. जनतेत रमणारा, जनतेसाठी झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही.
कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे व कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखले जाते. अशा अजित दादांच्या अकाली निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सुसंस्कृत दादा व्यक्तिमत्व हरपले. आपल्या अभ्यासू वृत्तीने व कामाच्या झपाट्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या दादांना महाराष्ट्र विसरू शकत नाही. हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वर पवार कुटुंबियांना देवो, अशा शब्दांत श्रीमती मुंडे यांनी शोक व्यक्त केला.