पिंपरी : पिंपरी परिसरात तडीपार गुंडाच्या सततच्या त्रासामुळे एका महिला पानटपरी चालकाला मानसिक छळाला सामोरे जावे लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने थेट पोलिस आयुक्त कार्यालयासमोर टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
अनिता सागर लांडगे (वय ५०, रा. लांडेवाडी, भोसरी) असे या महिलेचे नाव आहे. लांडेवाडी परिसरात ‘ममता’ नावाची त्यांची पानटपरी असून, सचिन डॅनियल खलसे (वय ४०, रा. लांडेवाडी, भोसरी) हा आरोपी त्यांच्याकडून दरमहा ५०० रुपयांची खंडणी मागत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खलसे हा टपरीवर आल्यानंतर सिगारेट व पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्यावर चिडला आणि “हप्ता दिला नाही तर टपरी जाळून टाकीन आणि जीवे मारण्याची धमकी देईन,” असे म्हणत दहशत निर्माण केली. याबाबत लांडगे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
प्राथमिक कारवाईनंतरही आरोपीकडून त्रास सुरूच राहिल्याचा दावा करत गुरुवारी सकाळी संबंधित महिला पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचली. तिथे तिने स्वतःला गंभीर इजा करून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला.
या घटनेनंतर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात खलसेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांनी सांगितले की, दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होते. नव्याने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे कठोर कारवाई करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरातील लहान व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.