सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

अमृता शेरगिल जयंतीनिमित्त ‘आपकी अमरी’ नाट्यप्रयोगाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डिजिटल पुणे    02-02-2026 11:45:45

पुणे: प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या ३० जानेवारी या  जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याला अभिवादन करणारा ‘आपकी अमरी’ हा नाट्यप्रयोग शनिवार, दि.३१ जानेवारी २०२६ रोजी पुणेकर रसिकांसमोर सादर करण्यात आला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ,ज्येष्ठ रंगकर्मी शेखर नाईक दिग्दर्शित  हा नाट्यप्रयोग भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सायंकाळी ६ वाजता झाला.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर करण्यात आलेला हा २७७ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला. ज्येष्ठ रंगकर्मी शेखर नाईक यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाट्यप्रयोगात मुग्धा भोसले आणि सानिका आपटे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. त्यांच्या संयत, भावपूर्ण आणि प्रभावी अभिनयामुळे अमृता शेरगिल यांचे व्यक्तिमत्त्व, संघर्ष, संवेदनशीलता आणि कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सजीव झाला. संहितालेखन शेखर नाईक आणि रमेशचंद्र पाटकर यांचे असून हिंदी अनुवाद चैतन्य कुलकर्णी आणि नचिकेत देवस्थळी यांनी केला आहे.

संगीत दिग्दर्शन चैतन्य आडकर यांचे असून रंगमंच रचना राज सांडभोर, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित आणि वेशभूषा संकल्पना वैशाली ओक यांनी केली. निर्मितीची जबाबदारी गायत्री चक्रदे यांनी सांभाळली. शेखर नाईक प्रोडक्शन्सचा हा नाट्यप्रयोग नयन पडवळ यांनी प्रस्तुत केला.

अमृता शेरगिल यांच्या जयंतीनिमित्त सादर झालेल्या या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभागृह भरून उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांनी नाट्यप्रयोगाच्या अखेरीस टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले.अमृता शेरगिल यांनी आयुष्याच्या विविध टप्प्यांवर लिहिलेल्या पत्रांवर आधारित या नाट्यप्रयोगातून त्यांच्या वैयक्तिक भावना, कलात्मक जाणिवा, सामाजिक भान आणि जीवनाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन प्रभावीपणे उलगडला. हिंदी भाषेतील या नाट्यात्म सादरीकरणाने प्रेक्षकांना अमृता शेरगिल यांच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची संधी दिली.

 

 


 Give Feedback



 जाहिराती