पुणे : बहुचर्चित पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत प्रमुख आरोपी आदित्य अविनाश सूद याला नियमित जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील इतर दोन आरोपी — आशीष मित्तल आणि अमर गायकवाड — यांनाही जामिनावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हा अपघात १९ मे २०२४ रोजी रात्री पुण्यातील कल्याणी नगर भागात घडला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने वेगात पोर्शे कार चालवत दोन आयटी अभियंत्यांना धडक दिली होती. या दुर्दैवी घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.तपासादरम्यान असे समोर आले की, अपघातावेळी कारमध्ये असलेल्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन अल्पवयीनांचे रक्तनमुने बदलण्यात आले होते. या आरोपाखाली ५२ वर्षीय आदित्य सूद आणि ३७ वर्षीय आशीष मित्तल यांना ऑगस्ट २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत पाटील आणि आबिद मुलानी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही कठोर अटी घातल्या असून, आरोपींनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे आणि कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायालयाची कडक टिप्पणी
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “जश्न साजरा करण्याचा अर्थ बेदरकारपणे वाहन चालवून निष्पाप लोकांचा जीव घेणे असा होत नाही,” असे त्या म्हणाल्या. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायदे अधिक कठोर करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी पालकांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. मुलांना महागड्या गाड्या व पैसे देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणे आणि वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
१८ महिन्यांनंतर जामीन
तीनही आरोपी गेल्या १८ महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जामिनाच्या अंतिम अटी ठरवण्याचा अधिकार कनिष्ठ न्यायालयाला देण्यात आला आहे.