बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला पाच दिवस उलटून गेले आहेत. 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. या घटनेने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. या कठीण काळात कुटुंबाला शोक बाजूला ठेवून राजकीय जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या.
या दरम्यान अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांची व्हॉट्सअॅपवरील भावनिक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी वडिलांसोबतचे दोन फोटो स्टेटसवर शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. “तुमची खूप आठवण येतेय, डॅड. काश वेळ थांबली असती तर मी तुम्हाला घट्ट मिठी मारून तसाच राहिलो असतो,” असे त्यांनी लिहिले आहे. या स्टेटसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
अजित पवार हे स्थानिक निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. धावपट्टीवर उतरताना विमान कोसळून स्फोट झाला आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो समर्थक उपस्थित होते.
दरम्यान, त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली आहेत. त्यांनी अलीकडेच कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. सध्या त्या बारामतीतील काटेवाडी येथील सहयोग निवासस्थानी दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत.