मुंबई : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला नवं वळण मिळालं आहे. या घटनेचा धागा अकोल्यापर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणांची हालचाल वाढली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये या टोळीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला असून रोहित शेट्टी यांना अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार केवळ “ट्रेलर” असल्याचा उल्लेख त्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
अकोला कनेक्शन काय आहे?
तपासादरम्यान शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीचा सहभाग समोर आला आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. यापूर्वीही त्याच्यावर बंदूक तस्करी प्रकरणात कारवाई झाली होती आणि त्याच्याकडून तीन पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. याबाबत कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुरावे तपास यंत्रणांकडून पडताळले जात आहेत. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
रविवारी काय घडलं?
1 फेब्रुवारी रोजी जुहू परिसरातील रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. या प्रकारानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी घरात बाहेरील लोकांना येण्यास मनाई केली.मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सध्या तपास सुरू आहे. शुभम लोणकर याचाही शोध घेतला जात आहे. अकोला कनेक्शनमुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक झाला आहे.