बारामती : अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अवघ्या दहा दिवसांत त्यांचा विमान अपघात झाला, तसेच त्यांच्याकडे महत्त्वाची फाईल होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या विधानावर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
मंगळवारी बारामती येथे पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “अजितदादा आपल्यातून जाऊन अवघे तीन-चार दिवस झाले आहेत. अशा वेळी राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू द्यायला हवी. हे मुद्दे नंतरही चर्चेला घेता येतील — मग एवढी घाई कशासाठी?”
राणे पुढे म्हणाले, “मी स्वतः पवार कुटुंबीयांच्या घरी जाऊन आलो. त्यांच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत वेदनादायक आहे. संजय राऊतांनी आधी प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहावी आणि मग बोलावे. सगळीकडे राजकारण करणे योग्य नाही. आधी आपण माणूस आहोत, नंतर राजकारणी.”त्यांनी आणखी टीका करताना सांगितले की, “घरातला कर्ता माणूस गेला आहे. अशा प्रसंगी तरी भान ठेवायला हवे. राजकारणाला काही मर्यादा असायला हव्यात. हा महाराष्ट्राचा संस्कार नाही.”फाईलच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “कुठली फाईल, कुठे आहे, हे संजय राऊतांना कोण सांगते? अशा विधानांमुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेणार नाही.”