बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती परिसरात झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. या घटनेनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारापासून अस्थिविसर्जनापर्यंतचे सर्व महत्त्वाचे विधी अत्यंत वेगाने आणि कुटुंबीयांच्या निर्णयानुसार पार पडले आहेत. त्यामुळे दहावा किंवा तेरावा दिवस असे कोणतेही पुढील सार्वजनिक विधी आयोजित केले जाणार नसल्याचे समजते.
२९ जानेवारीला बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर लगेच ३० जानेवारी रोजी अस्थी संकलनाचा कार्यक्रम पार पडला आणि सोनगाव येथील कऱ्हा–नीरा संगमावर अस्थिविसर्जन करण्यात आले. कुटुंबीयांनी याच वेळी आवश्यक धार्मिक विधी पूर्ण केल्यामुळे पुढील कोणतेही मोठे धार्मिक सोहळे होणार नाहीत, असे सांगितले जात आहे.
या निर्णयाबाबत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार किंवा जय पवार यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कुटुंबाने परंपरेपेक्षा व्यवहार्यता आणि साधेपणाला प्राधान्य देत अवघ्या तीन दिवसांत सर्व विधी उरकल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आज काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटींचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पवार कुटुंबीय नागरिक व राजकीय नेत्यांच्या भेटी स्वीकारणार आहेत. सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर येथे भेटीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे.
पार्थ पवार राज्यसभेत जाण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलै २०२८ पर्यंत आहे. मात्र, त्याऐवजी पार्थ पवार यांना पूर्ण सहा वर्षांच्या कार्यकाळासाठी राज्यसभेत पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.