पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.भारती विद्यापीठ परिसरात दोन जिवलग मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हाणामारीचे रूपांतर गंभीर हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या मैत्रिणीला फोन करण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला गेल्याने एका तरुणाने मित्रावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास भारती विद्यापीठ परिसरातील उसाच्या गाडी जवळ आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघे मित्र गप्पा मारत उभे होते. यावेळी जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर आदित्य कांबळे याने रागाच्या भरात चेतन चव्हाण यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात चेतन चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांची स्थिती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी आदित्य कांबळे याच्याविरोधात गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणांमधील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.