मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण वाहतूक कोंडी अखेर सुमारे 32 तासांनंतर सुरळीत झाली असली, तरी या घटनेमागील प्रमुख कारणांबाबत सरकारी पातळीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पर्यायी महामार्गाची तातडीची गरज असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, एक्स्प्रेसवेवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कर्जत–शिरूर पर्यायी महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वीच दिला होता; मात्र तो प्रस्ताव अद्याप मंजुरीअभावी प्रलंबित आहे. सध्या घाटमाथ्यावरील अनेक मार्गांमधील अंतर साधारण 20 ते 25 किलोमीटर असताना, माळशेज घाट ते लोणावळा या पट्ट्यात हे अंतर 70 ते 80 किलोमीटरपर्यंत असल्याने पर्यायी मार्गांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे एक्स्प्रेसवेवर अपघात किंवा अडथळा निर्माण झाला तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.
मुंबई महानगर प्रदेश, जेएनपीटी बंदर आणि औद्योगिक वाहतूक यासह पुणे, सोलापूर, अहमदनगर, हैदराबाद, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी अवजड वाहतूक प्रामुख्याने याच मार्गावर अवलंबून असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होते. त्यामुळे दीर्घकालीन उपाय म्हणून कर्जत–शिरूर महामार्गाची उभारणी आवश्यक असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची राज्य सरकारने दखल घेतली असून भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकर पूर्ण करण्यावरही भर देण्यात येत आहे.