सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

अनंतराव पवार महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न

डिजिटल पुणे    05-02-2026 18:34:59

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. व्याख्यानमालेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले, स्वर्गीय बाबुरावजी घोलपसाहेब, स्वर्गीय अनंतराव पवारसाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मा. श्री. नितीन भोसले यांनी ‘संपूर्ण शिवचरित्र आणि आजचा युवक’ या विषयावर गुंफले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले त्यापाठीमागील पार्श्वभूमी,

महाराजांचे पिता शहाजी भोसले यांच्या कार्याची ओळख करून दिली. आपल्याप्रमाणे मुलानेही चाकरी करावी हे न अपेक्षिता महाराजांच्या विचार आणि कृतीला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी जिजाऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली जडणघडण, महाराजांच्या मनात निर्मिलेले स्वराज्य निर्मितेचे स्वप्न, शिवपूर्वकालीन सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेची केलेली लूट, चारित्र्यहनन याबाबत विविध दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती अधोरेखित केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक केलेल्या लढाया, जिंकून घेतलेले किल्ले, नव्याने बांधलेले किल्ले, शिवाजी महाराजांची युद्धनिती, आग्र्याचा प्रसंग उपस्थितांसमोर मांडला. यावेळी त्यांनी आजच्या युवकांकडून असणाऱ्या अपेक्षांबाबत भाष्य केले. आजची तरुणाई इतिहास विसरत चालल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दुसरे पुष्प गजानन पातुरकर यांनी ‘हास्यविनोदातून समाजप्रबोधन’ या विषयावर गुंफले. यावेळी प्रथमतः सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या जीवनातील विनोदाचे स्थान अधोरेखित केले. जीवनानुभवातील ज्वलंत प्रश्न मांडले. शब्द हे बंदुकीच्या गोळीपेक्षा धारदार असल्याने बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलले पाहिजे असे मत मांडले. पुढे ते म्हणाले, की विनोद आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो. फक्त आपल्याला विनोद शोधता आला पाहिजे. कुठे, कसे, काय घ्यायचे हे महत्त्वाचे असल्याचे सांगताना आपल्या अभिनयातून प्रबोधन केले. यावेळी त्यांनी रस्ते,अपघात, अन्न पदार्थ, बाजारातील फसवणूक, सवलतीच्या नावाखाली होणारी लूट आदी विविध विषयांवर आपल्या खास शैलीतून उपस्थितांना हसवत विचार करण्यास भाग पाडले

तिसरे पुष्प डॉ. पांडुरंग कंद यांनी ‘वक्तृत्त्व कला आणि शास्र’ या विषयावर गुंफले. मार्गदर्शन करताना त्यांनी वक्तृत्त्व स्पर्धेतील वास्तव अधोरेखित केले. वक्तृत्त्व ही कला आणि शास्र असल्याचे सांगताना त्यांनी विविध घटकांच्या साहाय्याने अधोरेखित केले. ते म्हणाले की, आपण बोलताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्या म्हणजे आपण काय बोलतो, कसे बोलतो, किती बोलतो, कुठे बोलतो इत्यादी. पुढे त्यांनी वक्तृत्त्वातील सद्य स्थिती अधोरेखित केली. वक्तृत्त्व ही विचारवंत होण्याची पहिली पायरी असल्याचे सांगताना वक्ता आणि विचारवंत यातील फरक स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना वक्तृत्त्व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी काही घटक समजावून सांगितले, यामध्ये वक्तृत्त्वात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तयारी कशा प्रकारे करावी, महाजालावरील संदर्भ कसे तपासावेत, रोजच्या वाचनातील नोंदी कशा कराव्यात, आपली देहबोली, पेहराव, भाषणाची संहिता, बोलण्याचा सराव, बोलण्याचा वेग आदी महत्त्वपूर्ण घटकांवर भाष्य केले.व्याख्यानमालेच्या अध्यक्षीय मनोगतातून मा. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी व्याख्यानमालेतून कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत हे सांगून विद्यार्थी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

व्याख्यानमालेसाठी संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, सहसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन), ए. एम. जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र कार्यवाह डॉ. गणेश चौधरी, प्रा. भरत कानगुडे, डॉ. विजय बालघरे, डॉ. संतोष वाढवणकर, डॉ. किसन पालके, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, प्रा. दीप सातव यांनी काम पाहिले. कार्यालयीन अधीक्षक श्री. रमेश गिरमकर, श्री. निलेश ठोंबरे, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, अक्षय शिंदे, श्री. हनुमंत आटळे श्रीम. दिपाली पवळे, श्रीम. आम्रपाली डोळस आदींनी सहकार्य केले. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन आलिजा शेख, आरती भालेराव, रोहिणी गोरे, सोनाली सरोदे या विद्यार्थ्यांनी केले.डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती