पिंपरी–चिंचवड : पत्नी बेपत्ता झाल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून भोसरीतील एका तरुणाचा गुरुवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाने यापूर्वी चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात पोलिसांच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
मृत तरुणाचे नाव केशरी प्रसाद साहू (रा. भोसरी, मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आहे. गुरुवारी दुपारी तो धावडे वस्ती परिसरातील एका इमारतीवर गेला होता. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस आणि महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी साहू यांनी पत्नीशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार त्यांचे फोनवर संभाषण करून देण्यात आले.
दरम्यान, साहू यांनी यापूर्वी लिहिलेली चार पानी चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात त्यांनी पत्नी बेपत्ता असल्याचा उल्लेख करत तिला “कोणीतरी फूस लावून नेले असावे” असा संशय व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार करूनही तपास, सीसीटीव्ही पडताळणी आणि शोधकार्यात पुरेशी मदत न झाल्याचा आरोप केला आहे.
चिठ्ठीत त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले आहे की, “माझी पत्नी दुसरीकडे राहू शकत नाही. तिला परत आणा. ती नक्की परत येईल. ती माझ्यासोबत नसली तरी मी फक्त माझ्या मुलीसाठी जगत होतो.” तसेच अंत्यसंस्कारासंदर्भातही त्यांनी काही इच्छा व्यक्त केल्या आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, संबंधित महिला स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीसोबत गेली होती आणि पोलिसांनी संपर्क साधला असता तिने परत येण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप घोरपडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. साहू यांनी केलेल्या आरोपांवर पोलिसांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.या घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.