छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने पोर्टल पुन्हा सुरू केले असून, महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने अनेक लाभार्थी महिलांचे आर्थिक लाभ थांबले होते. त्यामुळे विविध ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात होती. याची दखल घेत महिला व बालविकास विभागाने सुधारणा करण्यासाठी पोर्टल खुले केले आहे.
का थांबले होते पैसे?
31 डिसेंबर 2025 पूर्वी अनेक लाभार्थी महिलांनी आधार-आधारित ई-केवायसी पूर्ण केली होती. मात्र, त्या प्रक्रियेदरम्यान “कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत आहे का किंवा निवृत्तीवेतन घेतो का” या प्रश्नावर चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनेक अर्ज संशयास्पद ठरले आणि पेमेंट रोखण्यात आले.
या पार्श्वभूमीवर 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, लाभार्थी व स्थानिक यंत्रणांकडून सुधारणा करण्याची संधी देण्याची मागणी वाढल्यानंतर शासनाने ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम संधी दिली आहे.
आता काय करावे लागेल?
चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांनी 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन माहिती दुरुस्त करावी लागणार आहे. यानंतरच त्यांची पात्रता निश्चित केली जाईल.
जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?
डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारीला वितरित करण्यात आला होता. मात्र जानेवारीचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो हप्ता वर्ग होण्याची शक्यता आहे.दरम्यान, निवडणुकीदरम्यान या योजनेतील रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीतही हा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे.