मुंबई (मालाड): बदलापूर येथील घटनेची आठवण करून देणारी धक्कादायक घटना मालाडमधील एका खासगी शाळेत समोर आली आहे. शाळेतील कर्मचाऱ्याकडून पाच वर्षांच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याचा आरोप पालकांनी केला असून, या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार, शाळेतील शिपायाने मुलीला भीती दाखवून गैरकृत्य केले. प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तातडीने शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली, मात्र प्रशासनाकडून सहकार्य मिळाले नसल्याचा त्यांचा दावा आहे. उलट, प्रकरण बाहेर जाऊ नये यासाठी शाळेच्या वरिष्ठांकडून दबाव आणण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
तक्रारीनंतर मालाड पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (३०) आणि शाळेचे सीईओ अनंत यज्ञीक (६५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम १०, १७ आणि २१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये शाळा प्रशासनाविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित शाळेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.सध्या पोलीस अल्पवयीन विद्यार्थिनीचा जबाब नोंदवत असून, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी नोंदी आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेची सखोल तपासणी करत आहेत.