सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे शहराने घेतला मोकळा श्वास

डिजिटल पुणे    07-02-2026 15:50:16

 पुणे : नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका नगरसेवक निवडणुकीनंतर पुणे शहराने जणू मोकळा श्वास घेतला आहे. निवडणुकीच्या सुमारे सहा महिने आधी इच्छुक उमेदवारांनी शहरभर असंख्य होर्डिंग, फ्लेक्स व बॅनर लावून पुणे शहराचे विद्रुपीकरण केले होते. शहरात फ्लेक्स लावण्यासाठी जागा नसताना थेट फुटपाथवर बेकायदेशीर फ्लेक्स लावण्यात आले होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सा. का. सचिन भोसले यांनी दिली.

या फ्लेक्सपैकी अंदाजे ९० टक्के फ्लेक्स हे पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने लावलेले होते. यामुळे नागरिकांना चालण्यास अडथळे, अपघाताचा धोका तसेच शहराच्या सौंदर्यावर मोठा आघात झाला. मात्र पुणे महानगरपालिकेने या बेकायदेशीर फ्लेक्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही पालिकेने प्रभावी कारवाई केली नाही. कागदोपत्री कारवाई दाखवली जाते, पण प्रत्यक्षात ९० टक्के अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईच होत नाही, असे सा. का. सचिन भोसले यांनी सांगितले.

मतदान झाले, निवडून येणारे निवडून आले आणि हरणारे हरले. मात्र या संपूर्ण कालावधीत पुणे महानगरपालिका झोपेतच होती. आता पुढील काळात इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जाणार नाहीत, हे जरी खरे असले तरी निवडणुकीदरम्यान नागरिकांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागले, त्याचा हिशोब कोण देणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

महानगरपालिकेने या घटनेतून बोध घेऊन यापुढे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर व होर्डिंगवर कडक नजर ठेवून तात्काळ व कठोर कारवाई केली पाहिजे. अन्यथा अतिक्रमण विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि फुकट पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी करण्यात येईल. जे अधिकारी नागरिकांना न्याय देत नाहीत, त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असा इशाराही सा. का. सचिन भोसले यांनी दिला.प्रभाग क्रमांक २, फुलेनगर, नागपूर चाळ येथील फुटपाथवर लावलेल्या अनधिकृत बॅनर व बॅनरच्या साठ्याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती