मुंबई : परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत.
सर्व विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून, प्रामाणिकपणा हीच त्यांची खरी ओळख आहे. परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आठवणीत राहणारा टप्पा असून, गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी परिश्रमपूर्वक तयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र मेहनत घेतली असून, त्या कष्टांना निश्चितच यश मिळेल, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या हातात केवळ उत्तरपत्रिका नसून, त्यात आई-वडिलांची स्वप्नेही असतात, असे सांगून मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचे, सकारात्मक विचार करण्याचे आणि कोणतेही दडपण न घेता परीक्षा देण्याचे आवाहन केले. परीक्षेच्या काळात आरोग्य जपावे, पुरेशी झोप घ्यावी, सकस आहार घ्यावा, मन शांत ठेवावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावे, यावरही त्यांनी भर दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना, कष्टाने, जिद्दीने आणि पालक-शिक्षकांच्या आशीर्वादाने विद्यार्थी स्वत:बरोबरच राज्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वासही मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.