मुंबई : बारावीच्या पहिल्याच बोर्ड परीक्षेसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील रहिवासी असलेल्या सोहम सचिन कटरे (१७) याचा हा अपघात कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडला. या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावी परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. सोहमचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालयात होते. त्यामुळे तो सकाळी लोकलने प्रवास करत होता. मात्र, गर्दीच्या वेळेत ट्रेनमध्ये प्रचंड दाटी झाल्याने त्याचा तोल गेला आणि तो चालत्या लोकलमधून खाली पडल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू केली. या अपघातामुळे सोहमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शाळा आणि परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.या दुर्घटनेमुळे मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दररोज हजारो विद्यार्थी आणि नोकरदार धोकादायक गर्दीतून प्रवास करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एसी लोकल सेवा सुरू झाल्यास दरवाज्यात उभे राहण्याचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.