पुणे : कोमल नवले यांची पुणे महानगरपालिकाच्या शिक्षण समितीच्या सदस्यपदी निवड प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे–वडगाव धायरी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. नवख्या नगरसेविका म्हणून त्यांनी अल्पावधीतच सक्रिय कामकाजाची छाप पाडली असून, आता शिक्षण क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे–वडगाव धायरी येथील नगरसेवक म्हणून कोमल नवले या स्थानिक पातळीवर विविध विकासकामांमध्ये पुढाकार घेत आहेत. शिक्षण समितीवर निवड झाल्यानंतर त्यांनी परिसरातील महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी, डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
“महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यावर भर देणार आहे. शिक्षक, पालक व प्रशासन यांच्या समन्वयातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करू,” असे नवले यांनी नमूद केले.त्यांच्या या निवडीमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.