सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक – अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

डिजिटल पुणे    14-02-2026 11:19:20

मुंबई  : सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असणे आणि कंपन्यांनी त्यादृष्टीने योग्य सेवा देण्यासाठी बांधील असणे गरजेचे आहे. यासाठी थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी  शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ‘महाविकास-२०२६’ या विशेष संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील ग्राहक संरक्षण चळवळ बळकट करण्यासाठी आणि थेट विक्री क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय थेट विक्री संघ (आयडीएसए) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले.

आयडीएसएच्या २०२३-२४ च्या वार्षिक अहवालानुसार, भारताच्या थेट विक्री क्षेत्रात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील उलाढाल ₹२,८७९ कोटी इतकी असून देशाच्या एकूण बाजारपेठेच्या १३% वाटा राज्याचा आहे. महाराष्ट्रातील १० लाखांहून अधिक थेट विक्रेते या क्षेत्राशी जोडलेले असून  देशातील ३९ लाख महिला या व्यवसायात सक्रिय असून महाराष्ट्रात ‘माविम’ अंतर्गत बचतगटांच्या माध्यमातून महिला उद्योजकतेचा मोठा विस्तार होत आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले की, “कायदे आणि नियम तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा त्यांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होते. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणे आवश्यक आहे आणि कंपन्यांनी त्यांच्या वर्तणुकीसाठी उत्तरदायी असणे गरजेचे आहे.  या संतुलनामुळेच एक सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण होईल.”

या संवाद परिषदेत विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ‘स्मार्ट ग्राहक, सक्षम बाजार’: ग्राहकांना नेमके काय माहीत असायला हवे?  यामध्ये मध्य मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्रा, ग्राहक वकील संघटनेचे अ‍ॅड. उदय वारुंजीकर तसेच संदीप वाही, उपाध्यक्ष, विक्री आणि प्रशिक्षण, इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. श्री. प्रांजल डॅनियल, मुख्य रणनीतीकार, यांनी मते मांडली. यामध्ये ग्राहकांनी थेट विक्री प्लॅटफॉर्मची निवड कशी करावी आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ‘उद्योजकतेतून महिला सक्षमीकरण’: महिला बचत गट आणि थेट विक्रेत्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा (ज्ञानदा, कारंदवाडी (सांगली), जय महिला बचत गट, साक्री (धुळे) आणि इतरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी/कर्मचारी, महिला आर्थिक विकास महामंडळतर्फे मदत प्राप्त महिला बचत गट तसेच अध्यक्ष डॉ. रत्नेश लाल, उपाध्यक्ष अपराजिता सरकार, आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती