पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील शिवरायांचे सर्व गड आणि किल्ले आता पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल आजच्या स्वरूपात दिसला नसता. त्या काळात अनेक राजे मोगल सत्तेखाली काम करत असताना राजमाता जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली. रयतेचे राज्य स्थापण्याचा संकल्प करून शिवरायांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र आणत स्वराज्य उभारले, असे त्यांनी नमूद केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, समुद्रमार्गे येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना घेऊन शिवाजी महाराजांनी जलदुर्गांची उभारणी केली आणि पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. त्यांच्या कारकिर्दीत समुद्री मार्गाने परकीय आक्रमणाला आळा बसला, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळासाठी नामनिर्देशित करण्यात आले असून 27 देशांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच, अजितदादांचे शिवनेरीवर विशेष प्रेम होते. त्यांच्या इच्छेनुसार राज्यातील किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात यश आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.2030 मध्ये शिवरायांची 400 वी जयंती भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने साजरी करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.