सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मंत्रालय लाच प्रकरण! झिरवळांचे खाजगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त
  • अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न, विखे पाटलांचा थेट सवाल
  • : अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र
 क्राईम

इस्रोच्या निवृत्त अधिकाऱ्याकडून पत्नीची हत्या; ‘माझ्यानंतर तिची काळजी कोण घेणार?’ म्हणत गुन्ह्याची कबुली

डिजिटल पुणे    20-02-2026 17:41:46

बंगळुरू : बंगळुरूमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या निवासी संकुलात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. इस्रो मधील ७६ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मृत्यूनंतर पत्नीची काळजी घेणारे कोणी नसल्याच्या भीतीतून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

आरोपी नागेश्वर राव (७६) हे इस्रोमध्ये टीम लीडर पदावर कार्यरत होते. सध्या ते मानसिक आरोग्याशी संबंधित उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना व्हाईटफिल्ड परिसरातील बोम्मनहळ्ळी येथील ‘द व्हर्चुओसो’ या ज्येष्ठ नागरिकांच्या निवासी संकुलात बुधवारी सकाळी घडली.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.१५ वाजता त्यांची पत्नी संध्या श्री (६३) स्वयंपाकघरात काम करत असताना राव यांनी टॉवेलच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळला. त्या बेशुद्ध पडल्यावर ते सुमारे २० मिनिटे मृतदेहाशेजारी बसून होते. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्याला फोन करून पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली. सुरुवातीला हा प्रकार विनोद असल्याचे शेजाऱ्याला वाटले; मात्र वारंवार सांगितल्याने त्यांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली.

संध्या श्री या जमिनीवर निश्चल अवस्थेत आढळल्यानंतर निवासी संकुलातील डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि पोलिसांना कळवण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून राव यांना ताब्यात घेतले.

पोलिसांसमोर राव यांनी गुन्ह्याची कबुली देत, “मी अजून फार वर्षे जगणार नाही. माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार?” अशी भावना व्यक्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेनंतर त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा विचार केला होता; मात्र तो निर्णय बदलल्याची माहितीही समोर आली आहे.हे दाम्पत्य मूळचे आंध्र प्रदेशातील असून तीन वर्षांपूर्वी त्यांनी हा फ्लॅट खरेदी केला होता. त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्यास आहे.

सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढत्या निवासी संकुलांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती