मुंबई : स्वातंत्र्यानंतर देशाचे संविधान अंमलात येऊन यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘संविधान अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आपलं संविधान – आपला अभिमान’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संविधान जनजागृती डिजिटल रथाचे उद्घाटन नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचा भाग असलेला संविधान जनजागृती डिजिटल रथ छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी भेट देत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून, नागरिकांनीही या रथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या डिजिटल रथामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधान सभेची भूमिका तसेच नागरिकांना प्रदान केलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती प्रभावी माध्यमातून सादर करण्यात आली आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणविरोधी अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार तसेच घटनात्मक उपायांचा अधिकार यांसह संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या जनजागृती उपक्रमाद्वारे लोकशाही मूल्यांचे महत्त्व, संविधानाचे सामाजिक स्थान आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले जात आहे.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये संविधानाबाबत अभिमानाची भावना वृद्धिंगत होत असून, विशेषतः विद्यार्थी व युवा पिढीत संविधानाचा आदर, कर्तव्यभावना आणि लोकशाही मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.