नागपूर : शहरातील बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्राशी संबंधित केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सखोल चौकशी सुरू आहे.
माहितीनुसार, ‘XII’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सकाळी सुमारे 10.37 वाजता केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका शेअर करण्यात आल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर उपलब्ध झाल्याने प्रकाराची गंभीरता वाढली आहे.
दरम्यान, परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी तपासणी केली. स्वच्छतागृहातून परत येण्यास विलंब झाल्यानंतर तिच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला. तपासात संबंधित मोबाईलमध्ये दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. चौकशीत तिने आणखी एका विद्यार्थिनीचे नाव सांगितले. तिच्याकडूनही मोबाईल जप्त करण्यात आला असून ती देखील त्याच ग्रुपची सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक चौकशीत संबंधित विद्यार्थिनींनी खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकावर पैसे घेऊन पेपर उपलब्ध करून दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, आर्थिक व्यवहार झाले का आणि पेपर प्रत्यक्षात कसा बाहेर गेला, याचा तपास सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिली.
‘XII’ या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एकूण 21 विद्यार्थी सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्वांची चौकशी करण्यात येणार असून शहरात अशाप्रकारचे इतर ग्रुप सक्रिय होते का, याचाही शोध घेतला जात आहे.
घटनेनंतर सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रप्रमुखांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.दरम्यान, “प्राथमिक तपास सुरू असून संबंधित सर्व विद्यार्थ्यांची आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल,” असे डॉ. पटवे यांनी सांगितले.