मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भाषण करताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादा नेहमी त्यांच्या शर्टचे वरचे बटण लावण्याबाबत सुचना करायचे. मात्र आता ते बटण तसेच उघडे ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “जेव्हा आयुष्यात कधीतरी त्यांची पुन्हा भेट होईल, तेव्हा त्यांच्या समोर हे बटण लावेन. तोपर्यंत ते उघडेच राहील आणि रोज त्यांची आठवण करून देईल,” असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार नावाचा जादूगार संपूर्ण महाराष्ट्राला हसवत गेला. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा हरपला आहे.” त्यांनी अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील काही प्रसंगांचाही उल्लेख केला.
यावेळी त्यांनी केसांच्या स्टाईलबाबतची आठवणही सांगितली. “दादा म्हणायचे केस कमी कर. त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. त्यांनी मला शारीरिक वजन कमी करून राजकीय वजन वाढवायला सांगितले होते. तो शब्द मी पाळेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
अपघात प्रकरणाचा उल्लेख करताना रोहित पवार ठामपणे म्हणाले की, “या घटनेला जो कुणी जबाबदार असेल, तो कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.” तसेच काकींना त्यांच्या राजकीय प्रवासात लागेल ते सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.सभागृहातील हे भाषण भावनिक आणि ठाम भूमिकेचे मिश्रण असल्याचे चित्र पाहायला मिळाले.