पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूचा तपास सध्या सीआयडीकडे सोपविण्यात आला असून, या प्रकरणात घातपात, क्रिमिनल निग्लीजन्स (गुन्हेगारी निष्काळजीपणा) तसेच संभाव्य गुन्हेगारी कट या तिन्ही अंगांनी चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली आहे.
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी एफआयआर नोंदविण्याच्या मागणीसाठी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस स्टेशन तसेच बारामती पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाला अधिक गती मिळाली.सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या गांभीर्याचा विचार करून आकस्मिक मृत्यूची नोंद कलम १९४ अंतर्गत सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.
तपासाची तीन प्रमुख दिशा
सीआयडीकडून सध्या खालील तीन मुद्द्यांवर तपास सुरू आहे:
दुर्घटनेमागे घातपात होता का?
कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून गुन्हेगारी निष्काळजीपणा झाला का?
या घटनेत गुन्हेगारी कट किंवा इतर कोणतेही आपराधिक कृत्य होते का?
तपास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले.
विविध यंत्रणांचा सहभाग
या तपासात बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा फॉरेन्सिक विभाग, पुणे येथील फॉरेन्सिक सायन्स लॅब, विमानवाहतूक प्राधिकरण आणि इतर केंद्रीय संस्था सहकार्य करत आहेत. तसेच Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो सीआयडीच्या तपासात समाविष्ट केला जाणार आहे.
दरम्यान, संबंधित विमान सेवा देणाऱ्या Directorate General of Civil Aviation (DGCA) कडून VSR कंपनीवर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तांत्रिक तपास आणि आकस्मिक मृत्यूचा तपास हे स्वतंत्र विषय असल्याचे सीआयडीने स्पष्ट केले.
सीबीआयकडे तपास वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने हा तपास Central Bureau of Investigation (CBI) कडे वर्ग करण्यासाठीही पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले. मात्र सध्या सीआयडीकडूनच तपास सुरू असून तो व्यावसायिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालू असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
वेळापत्रक निश्चित नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तपास प्रक्रियेला ठराविक वेळमर्यादा नसते, असे सांगत अधिकाऱ्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. अनेक तांत्रिक अहवाल, तज्ज्ञांचे मत आणि गोळा केलेले पुरावे यांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.एकूणच, या प्रकरणातील सर्व शक्यता तपासाच्या कक्षेत असून पुरावे आणि अहवालांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सीआयडीने स्पष्ट केले आहे.