मुंबई: दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असून बारामती पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी ठिय्या आंदोलनही केले. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पत्रकार परिषदेतून ते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. आमदार अनिल पाटील यांनी आरोप केला की, “रोहित पवारांना पक्षावर ताबा मिळवायचा आहे, त्यामुळे ते आमच्या नेत्यांवर आरोप करत आहेत.” जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर ते तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटील पुढे म्हणाले की, दिवंगत नेत्यांबद्दल खरे प्रेम असेल तर अशा प्रकारचे ‘नाटक’ करण्याची गरज नाही. तसेच, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली असून योग्य तो सन्मान राखला गेला आहे. संपूर्ण घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य समोर यावे, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनीही रोहित पवारांवर टीका करत, “दररोज नवे पुरावे समोर आणण्यापेक्षा ते वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा का करत नाहीत?” असा सवाल उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात संबंधित मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे आणि रोहित पवार करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचेही ते म्हणाले.या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. तपास यंत्रणांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.