पुणे : आगामी धुलीवंदन, रमजान आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) तसेच विविध मोर्चे, धरणे, आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये हे आदेश लागू करण्यात आले असून ते दिनांक ०३ मार्च २०२६ रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते १६ मार्च २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत एकूण १४ दिवस प्रभावी राहतील.
पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांच्या मान्यतेने हा आदेश जारी केला आहे.
आदेशानुसार प्रमुख निर्बंध :
कोणताही दाहक, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास मनाई.
दगड, शस्त्रे, अस्त्रे, फेकावयाची हत्यारे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू जवळ ठेवण्यास बंदी.
चित्रे, प्रतिकात्मक पुतळे किंवा व्यक्तींच्या प्रतिमांचे प्रदर्शन अथवा दहन करण्यास मनाई.
मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे, भडक भाषणे करणे किंवा सार्वजनिक शांततेस बाधा येईल असे कृत्य करण्यास बंदी.
सार्वजनिक नैतिकता, शालीनता किंवा राज्याच्या सुरक्षिततेस धोका पोहोचेल अशा फलक, चिन्हे, साहित्य तयार करणे किंवा प्रसारित करण्यास मनाई.
पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास बंदी
कलम ३७ च्या पोटकलम (३) नुसार, पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यास बंदी घालण्यात आली आहे.
अपवाद
शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना तसेच ३.५ फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
उल्लंघनास शिक्षा
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.