पुणे : पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर यांच्या वतीने दि. २७/०२/२०२६ रोजी रात्रौ ००.०० ते २४.०० या कालावधीत दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मारहाण, आत्महत्येस प्रवृत्त करणे, ऑनलाइन फसवणूक, अपघाती मृत्यू आणि चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
कोंढवा येथे मारहाण व दहशत
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२६ अंतर्गत पाच अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री गाजी हॉटेल, मलिकनगर, कोंढवा खुर्द येथे फिर्यादी व त्यांच्या मित्रास धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ व मारहाण करत दहशत माजवली. आरोपी फरार असून पुढील तपास सुरू आहे.
वारजे माळवाडी येथे विवाहितेला त्रास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२६ अंतर्गत महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्नेहांकित कॉलनी, कर्वेनगर येथे राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेला २०१८ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील करत आहेत.
कोथरूडमध्ये ऑनलाइन फसवणूक; सुमारे ४.९८ लाखांचा गंडा
कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६/२०२६ अंतर्गत एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक झाल्याची नोंद आहे. पेन्शनर्स रिटायर्ड क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवून अज्ञात मोबाईल धारकाने तब्बल ४,९८,०१५ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. आरोपींचा शोध सुरू आहे.
लोणीकंद येथे भरधाव पिकअपची धडक; अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८/२०२६ अंतर्गत पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी थेऊर रोड, कोलवडी परिसरात भरधाव व निष्काळजी वाहन चालवून सुमारे ५० वर्षीय अनोळखी पुरुषास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
काळेपडळ येथे रिक्षामध्ये सोनसाखळी चोरी
काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ अंतर्गत चार अनोळखी इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ससाणेनगर कॅनॉल ते डी-मार्ट दरम्यान रिक्षामध्ये प्रवास करत असताना ६३ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे ९४,०५० रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली.
सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर यांनी दिली आहे.