पुणे : महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने नवनिर्वाचित नगरसेवकांनी पहिले ठोस पाऊल उचलत व्यंकटेश शर्विल सोसायटी लगत, सर्व्हे नं. 26, धायरी (नरे-धायरी परिसर) येथे सुमारे पाच एकर क्षेत्रामध्ये साकारण्यात येणाऱ्या आधुनिक उद्यानाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाले.
नऱ्हे धायरी परिसरातील नागरिक, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची या ठिकाणी सुयोग्य उद्यान व्हावे अशी दीर्घकाळापासून मागणी होती. वाढती लोकवस्ती आणि खेळण्यासाठी, फिरण्यासाठी सुरक्षित व स्वच्छ जागेअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या पार्श्वभूमीवर भविष्यात हे ठिकाण एक प्रमुख विरंगुळा केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे. गार्डनमध्ये चिल्ड्रन्स पार्क, ओपन जिम, चालण्यासाठी प्रशस्त ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, हिरवळ (लॉन), आकर्षक फाउंटन अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आपल्या प्रस्ताविक भाषणात नगरसेवक हरिदास चरवड यांनी या उद्यानाचे महत्त्व अधोरेखित करताना नऱ्हे आणि धायरी परिसरातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्नही उपस्थित केला. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी आमदार भीमराव अण्णा तापकीर आणि शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्याकडे केली. यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या बससेवेचेही उद्घाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी हे गार्डन वर्षभराच्या आत पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर केला व आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच या भागातील पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी समस्यांवरही लवकरच प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.