बीड : देशभरात आज होळीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत असून घरोघरी सकाळीच होळी पेटवून पूजन करण्यात आलं. तर, संध्याकाळी गावागावात मोठ-मोठ्या होळी पेटवल्या जाणार आहेत. त्यानंतर, सर्वत्र उद्या धुलीवंदन साजरे केले जाईल, मुंबईसह मोठ्या शहरात उद्यापासूनच रंगपंचमीची धूम पाहायला मिळेल. त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रात धुलीवंदनाची तयारी सुरू आहे.होळी आणि धुलवडीचा उत्साह राज्यभरात सुरू असताना बीड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. धुलवडी साजरी करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड-शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ ही दुर्घटना घडली. कृष्णा मुळे (वय अंदाजे तरुण) हा आपल्या मित्रांसोबत धुलवडी निमित्त वॉटर पार्ककडे जात होता. दरम्यान, वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला पलट्या खात जाऊन थेट विहिरीच्या कठड्याला धडकली. सुदैवाने वाहन विहिरीत कोसळले नाही; मात्र अपघाताची तीव्रता मोठी होती.
या दुर्घटनेत कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि आणखी एक युवक जखमी झाले आहेत. अपघातावेळी त्यांच्या मागेच मित्रांची दुसरी कार येत होती. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धुलवडीच्या सणावर शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.