मुंबई : इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सध्या संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. मध्य पूर्वेतील तणाव दिवसागणिक वाढत असतानाच, त्याचा परिणाम जगभरातील प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. इराणनं कुवेत, दुबईसह अनेक देशांवर हल्ले केल्यानंतर जगभरातील प्रवाशांवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीनंतर अनेक देशांनी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. तसेच, दुबई विमानतळही बंद करण्यात आलंय आणि अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीत. अशातच भारतातील अनेक प्रवासी आखाती देशांमध्ये अडकून पडलेत. दुबईत अडकलेल्या काही प्रवाशांना विमानानं मुंबई आणि बंगळुरूमध्ये आणण्यात आलं. पण, त्यासोबतच कुवेतमध्येही काही भारतीय अडकल्याची माहिती मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक व्हिडीओ शेअर करुन दिली आहे.
मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतील हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. काही देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून, त्यामुळे भारतीय प्रवासी विविध देशांत अडकून पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत मदतीची मागणी केली आहे. त्यांचा मुलगा लंडनला जात असताना त्याचे विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आले. मात्र, त्यानंतर वाढलेल्या तणावामुळे उड्डाणे रद्द झाली आणि तो गेल्या चार दिवसांपासून कुवेतमध्येच थांबलेला आहे.
विशाखा सुभेदार यांनी आपल्या व्हिडीओतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आवाहन केले आहे. “माझ्या मुलासह कुवेतमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, सध्या कुवेतमधील परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती मिळत असून, तेथे अडकलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये काळजीचे वातावरण आहे. सरकारने लवकरात लवकर मार्ग काढून भारतीय नागरिकांना मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे अनेक देशांनी हवाई वाहतुकीवर निर्बंध लावले असून, भारतीय दूतावासांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.