सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इस्रायलची गुप्त नजर, सीसीटीव्ही ते मोबाईल नेटवर्कवर पकड; अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा
 शहर

वहिवाटीचा रस्ता खुला करताना महिलांना पुढे करुन महिला पोलिसांना धक्काबुक्की ;थेऊरमधील कोलवडी येथे हाय व्होल्टेज ड्रामा

डिजिटल पुणे    09-03-2026 10:44:18

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊरजवळील मौजे कोलवडी गावातील शितोळे वस्ती येथे गट क्र. १६८ मधील पूर्वापार वहिवाटीचा  ६ वर्षांपासून बेकायदेशीररित्या बंद असलेला रस्ता मामलेदार कोर्टाच्या आदेशानंतर खुला करण्यास लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील व  पोलीस निरीक्षक संगीता रोकडे  या महिला अधिकाऱ्यांच्या  कणखर भूमिकेमुळे पूर्वापार वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अखेर खुला झाला.महिला पोलिसांना चावून,लाथ मारून,धक्काबुक्की, झटापट करून शासकीय कारवाईत अडथळा आणणाऱ्या महिला आणि अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ही कारवाई सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी ५ वाजता संपली.६० एकरातील १५ हून अधिक  शेतकऱ्यांच्या वहिवाटीला एकाच कुटुंबाने बेकायदेशीर अडथळा निर्माण केला होता.

या रस्त्यावरून ऍड.मंगेश ससाणे,अमोल ससाणे,योगेश ससाणे,प्रमोद शितोळे,प्रकाश शितोळे,सतिश बोरकर,राजेंद्र बोरकर,मधुकर हरगुडे,चेतन काळभोर,दत्तात्रय काळभोर,सूर्यकांत शितोळे यांसह अनेक शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी अवलंबून होते.मात्र किरण शितोळे,अमर उर्फ बाबा शितोळे  यांच्या कुटुंबाने लोखंडी गेट लावून रस्ता बंद केला होता,रस्त्यात आंब्याची लागवड करून मे २०२१ मध्ये रस्ता अडवला होता.त्यानंतर प्रमोद शितोळे,ऍड.मंगेश ससाणे,योगेश ससाणे,सतीश बोरकर,चेतन काळभोर यांनी मामलेदार कोर्टात सेक्शन ५ अंतर्गत रस्ता खुला करण्यासाठी दावा दाखल केला,मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ कलम ५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४३ अंतर्गत दाखल दाव्यात तहसिलदार/उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थळपहाणी अहवाल,गुगल नकाशा,पीएमआरडीए  नकाशा,साक्षीदारांच्या ऍफिडेव्हिट यांच्या आधारे रस्ता अस्तित्वात असल्याचे आणि अडथळा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.२०२१-२२ मध्ये रस्ता खुला करण्याचे आदेश पारित झाले, त्यानंतर प्रांताधिकारी यांचेकडे केलेले  रिव्हिजन अर्ज  फेटाळले गेले.

त्यानंतर आजपर्यंत ४ वेळा रस्ता खुला करण्याची अंमलबजावणीची नोटीस निघाली, परंतु काही न काही कारणामुळे अंमलबजावणी झाली नाही, याचा प्रचंड त्रास बाधित शेतकऱयांना ५ वर्ष सोसावा लागला.६ मार्च रोजी २०२६ मध्ये तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी स्वतः गुडघाभर चिखलात उतरून पूर्ण क्षेत्राची पाहणी केली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून समेट घडवण्याचा प्रयत्न केला.मात्र किरण शितोळे आणि त्यांच्या कुटुंबाने कायदा व सुव्यवस्था न मानता, गावातील वरिष्ठ मंडळी, पोलीस पाटील, सरपंच, तहसीलदार यांचे न ऐकता पर्यायी मार्गाचा प्रस्ताव फेटाळले  व आडमुठे धोरण घेतले. नदीकाठचा पर्यायी मार्ग धोकादायक असल्याचे सांगूनही ऐकले नाही. कारवाई सुरु झाल्यावर घरातील महिलांना पुढे केले, रस्त्यावर झोपायला लावले  यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत काही महिलांसह गुन्हे दाखल झाले.हे करताना किरण शितोळे याने  " कारवाई केली तर गुन्हे दाखल करू, मंत्रालयात जाऊ, मंत्र्यांना  बोलतो, प्रेस मध्ये देतो, झाडे  काढली तर हरित लवादात जाणार.. अशा धमक्या प्रशासकीय कर्मचारी,मंडल अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,तहसीलदार यांना दिल्या.

त्या धमक्याना न जुगारता तहसीलदार तृप्ती कोलते,लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता रोकडे या महिला अधिकाऱ्यांनी कणखर व रोखठोक भूमिका घेत रस्ता खुला करण्याचे काम पोलीस संरक्षणमध्ये चालू ठेवले, कोलवडी गावचे तलाठी स्वामी , मंडल अधिकारी जाधव  यांच्या देखरेखीमध्ये हे काम झाले.रात्री बारानंतर पुन्हा किरण शितोळे याने घरातील महिलांना पुढे करून काम थांबवले, महसूल अधिकारी व पोलिसांन धमक्या दिल्या याचे  सर्व चित्रीकरण पोलिसांनी करुन घेतले, त्यानुसार पहाटे ३ वाजता लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणला म्हणून किरण शितोळे, बाबा शितोळे,यशोदा अमर शितोळे, पूनम किरण शितोळे, मैत्रेयी  अमर शितोळे,रोहिणी शशिकांत घोरपडे यांचेवर मंडल अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला.

सकाळी सर्वाना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी  ताब्यात घेतले व त्यानंतर पुन्हा रस्ता  खुला करण्याचे काम पोलीस बंदोबस्त मध्ये सुरु केले.संध्याकाळी हा  रस्ता खुला झाला. ५ वर्षांपासून बंद असलेला रस्ता आता शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे उपलब्ध होणार आहे. प्रभावित शेतकरी हे तृप्ती कोलते-पाटील यांच्या त्वरित आणि निष्पक्ष कारवाईचे क्षेत्रातून कौतुक करत आहेत.तसेच लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता रोकडे,पोलीस निरीक्षक सुरवसे,पोलीस निरीक्षक दिलीप पालवे,पोलीस निरीक्षक अर्जुन बेलगुडे, पोलीस निरीक्षक वंजारी, स्वप्नील जाधव व सर्व स्टाफ यांनी यासाठी मोलाची भूमिका बजावली."हा शेतकऱ्यांचा खरा विजय आहे," असे  शेतकऱ्याने सांगितले.आज रस्ता सुरु करण्याची कारवाई झाली, रस्ता सुरु झाला.. पण त्यानंतर सदर किरण शितोळे व कुटुंबातील व्यक्तींनी  हा रस्ता परत बंद केला नाही पाहिजे असं मत व शंका  शेतकऱ्याच्या मनात आहे, किरण शितोळे हा गुंडगिरी प्रवृत्ती चा दमदाटी करणारा असल्याने शेतकरी साशंक आहेत.पण गटातील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी अडवणूक केली तर  तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश तृप्ती कोलते यांनी दिलेले आहेत.तसेच पोलीस निरीक्षक रोकडे यांनी संबंधित व्यक्तींना परत अडवणूक केली तर सक्त कारवाई करणार अशी ताकीद  दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक :

एड.मंगेश ससाणे -99223 07777

तहसीलदार तृप्ती कोलते -98507 19596


 Give Feedback



 जाहिराती