सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण-इस्रायल संघर्षाचा भारतावर परिणाम; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘ECA’ कायदा लागू केला
  • महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘Come Early, Go Early’ योजना; सुनेत्रा पवारांची विधिमंडळात मोठी घोषणा
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 क्राईम

पुण्यात जबरी चोरी, घरफोडी, ऑनलाईन फसवणूक आणि मारहाणीचे गुन्हे; विविध पोलीस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल

डिजिटल पुणे    09-03-2026 15:08:59

पुणे : पुणे शहरात ८ मार्च २०२६ रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मारहाण, जबरी चोरी, घरफोडी, ऑनलाईन फसवणूक आणि धमकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतची माहिती पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमधून समोर आली आहे.

फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार पेठेतील धनलक्ष्मी सुपर मार्केटसमोर ७ मार्च रोजी रात्री एका ४२ वर्षीय व्यक्तीवर मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली. या प्रकरणी अजय शेखर सुर्वे (वय २८, रा. मंगळवार पेठ) याला अटक करण्यात आली असून त्याचे तीन साथीदार फरार आहेत.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक कामटे उद्यानासमोरील श्री बालाजी ट्रेडर्स या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. गल्ला फोडून सुमारे ३ लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना ७ मार्च रात्री ते ८ मार्च सकाळ दरम्यान घडली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पायी जाणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा सुमारे १० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून जबरी चोरी केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मांजरी परिसरात एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलला रिव्ह्यू देण्याचे टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून अज्ञात मोबाईलधारकाने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि तब्बल ५ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

तर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनकवडी गावठाण येथे अतिक्रमण करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यात हातोडा मारून जखमी केले. तसेच त्याच्या साथीदारांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे.या सर्व घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती