ठाणे: राज्यात रस्ते अपघातांच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच मुंबई–नाशिक महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात भिवंडीतील दोन ऑटो रिक्षाचालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनाळे परिसरात अज्ञात वेगाने येणाऱ्या वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, भिवंडीतील घुंघट नगर येथे राहणारे ऑटोचालक राजकुमार गुप्ता (वय 40) आणि महेंद्र केसरवानी (वय 39) हे दोघेही एकाच ऑटो रिक्षातून (MH 04 KA 3124) भिवंडी बायपासमार्गे सोनाळेकडे जात होते. त्यावेळी मुंबई–नाशिक महामार्गावर सोनाळे परिसरात मागून वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
धडक इतकी तीव्र होती की दोघेही रिक्षातून बाहेर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नव्या रिक्षा परवान्यांवर स्थगिती
दरम्यान, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने नव्या रिक्षा परवान्यांवर तात्पुरती स्थगिती लागू केली आहे. या निर्णयाबाबत रिक्षाचालकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काही चालकांनी निर्णयाचे स्वागत केले असून तरुण चालकांनी मात्र रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.