निगडी : भारतीय स्त्री ही आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार, तसेच ती या देशाचाही आधार असते, जिजाऊ साहेब होत्या म्हणून शिवराय घडले तसेच आजही सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी त्यांची आई ,पत्नी, बहीण खंबीरपणे उभ्या आहेत त्यामुळे हे राष्ट्र टिकून राहील. कारण स्त्रिया यादेखील राष्ट्राचा प्रमुख आधार म्हणून कार्यरत आहेत, भारतीय स्त्रियांच्या पराक्रमाचा वारसा जपून समस्त हिंदूची एकजूट घडवून आणूया असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार, प्रखर वक्त्या ह भ प सुश्री सुप्रियाताई साठे- ठाकूर यांनी केले. हिंदू एकता रुपीनगर येथे आयोजित केलेल्या महिला हिंदू संमेलन व भारत मातेची आरती या कार्यक्रमात त्या व्यासपीठावरून बोलत होत्या. शर्वरीताई येरगट्टीकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्वाच्या पंचपरिवर्तन या मुद्द्यांची माहिती दिली ज्यामध्ये स्वतःच्या संस्कृती बद्दल आदर बाळगणे हे स्त्रियांचे कर्तव्य आहे, तसेच नागरिक शिष्टाचार पाळणे, कुटुंब व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन समरसता पूर्ण व्यवहार करणे व पर्यावरण रक्षण व संवर्धन करणे हे स्त्रियांचे कर्तव्य आहे असे मत मांडले.
यावेळी शेकडो महिलांच्या हस्ते भारत मातेची आरती करण्यात आली होती .अनेक मुली व माता-भगिनी या विविध राष्ट्रमातांच्या वेशभूषा केल्या होत्या. मुलींचे लाठीकाठी सादरीकरण झाले , महिला भजनी मंडळातर्फे भजने सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमाला रुपीनगर तळवडे परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच सर्व राजकीय पक्षाच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रुपीनगर मधील समस्त महिला भगिनींनी केलेले होते .आगामी काळात हिंदुत्वाच्या व राष्ट्राच्या आरक्षणासाठी असेच वेळोवेळी एकत्र येण्या चा संकल्प उपस्थित सर्व महिलांनी घेतला.