छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर रील्समुळे तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेला कंटेंट क्रिएटर अरुण तुपे याच्या आकस्मिक निधनाने छत्रपती संभाजीनगर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर रील शेअर केली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानं मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे सहा वाजता उठला होता. त्यानंतर “थोडा वेळ परत झोपतो” असे सांगून तो पुन्हा झोपला. काही वेळानंतर आईने उठवण्याचा प्रयत्न केला असता तो प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या क्लिनिकमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्याला त्वरित घाटी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या एका कॅफेच्या प्रमोशनल शूटसाठी सिनेमॅटोग्राफरने अरुणला फोन केला असता, फोन त्याच्या मित्राने उचलला. “अरुण आता कधीच येऊ शकणार नाही,” असे सांगत त्याच्या निधनाची माहिती दिल्याने सर्वांनाच धक्का बसला.
अरुण तुपे हा मेहनती कुटुंबातून पुढे आलेला तरुण होता. त्याच्या आईचा शिवणकामाचा व्यवसाय असून वडील साऊंड सिस्टीमशी संबंधित काम करतात. सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्याच्या साधेपणा आणि मनमिळाऊ स्वभावामुळे मित्रपरिवारातही तो आवडता होता. नव्याने कंटेंट तयार करणाऱ्यांना तो मार्गदर्शनही करत असल्याचे मित्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, मृत्यूच्या अवघ्या २४ तास आधी त्याने आकाशवाणी परिसरात एका व्हायरल गाण्यावर रील शूट करून ती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर अचानक घडलेल्या या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडिओ पुन्हा मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चाहत्यांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण तुपेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनादरम्यान तपासासाठी व्हिसेरा जतन करण्यात आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.अरुण तुपेच्या निधनानंतर मंगळवारी सायंकाळी फुलंब्री येथील त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मित्र, नातेवाईक आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याला अखेरचा निरोप दिला.