नाशिक : राज्यात गाजत असलेल्या बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात नाशिकचा धक्कादायक संबंध समोर आला आहे. पोलिस तपासादरम्यान नाशिकमधील एका आयव्हीएफ सेंटरमधून गेल्या वर्षभरात तब्बल ९६ महिलांची बीजांडं (अंडाणू) खरेदी करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कागदपत्र तपासणीत ही बाब समोर आली. तपासादरम्यान संबंधित मालती आयव्हीएफ सेंटरच्या कागदपत्रांच्या आधारे बदलापूरमध्ये बेकायदेशीर आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नाशिक महापालिकेने यापूर्वीच या आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द करत केंद्र सील केले आहे. तपासासाठी महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात सेंटरचे संचालक डॉ. अमोल पाटील यांना बदलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्यावर सरोगसीसंदर्भातील एजंट म्हणून काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एकाच महिलेची बीजांडं वारंवार काढली का?
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. काही महिलांकडून एकापेक्षा अधिक वेळा बीजांडं काढण्यात आली का, याचीही चौकशी सुरू आहे. आरोग्य विभाग आणि गृह विभाग संयुक्तरीत्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
बदलापूरमध्ये स्त्रीबीजांच्या बेकायदेशीर विक्रीचं जाळं उघडकीस आलं आहे. हे संपूर्ण रॅकेट एका घरातून चालवले जात असल्याचा आरोप आहे. सुलक्षणा गाडेकर या महिलेच्या घरी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्त्रीबीज वाढवण्यासाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स सापडली.
तपासानुसार, आर्थिक गरज असलेल्या महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांना ही इंजेक्शन्स दिली जात होती. त्यानंतर त्यांच्या शरीरात बीजांडांची वाढ झाल्यावर त्यांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून ऑपरेशनद्वारे अंडाणू काढले जात होते. नंतर त्यांची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे.
बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाने छापा टाकल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे रॅकेट केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तराशीही संबंधित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली असून पुढील चौकशी सुरू आहे.