उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने करिअर गायडन्स विषयक विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून “सोसायटी ऑफ पेरेंट्स ऑफ चिल्ड्रन विथ ऑटिस्टिक डिसऑर्डर (SOPAN)” या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या “सुविधा कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन” येथील सहायक प्राध्यापक सुनंदा चक्रबोर्ती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चक्रबोर्ती यांनी SOPAN संस्थेची उद्दिष्टे, विशेष मुलांसाठी राबविले जाणारे शैक्षणिक उपक्रम तसेच सुविधाद्वारे चालविल्या जाणाऱ्या पूर्णवेळ व अर्धवेळ कोर्सेसची माहिती सविस्तर दिली. त्यांनी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या मुलांची मुख्य लक्षणे, त्यांची शैक्षणिक व भावनिक गरज, तसेच अशा मुलांसाठी प्रशिक्षित विशेष शिक्षकांची गरज अधोरेखित केली आणि समाजात ऑटिझमबाबत योग्य जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी श्रीमती तृप्ती म्हात्रे कडू यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रत्यक्ष अनुभव, या क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि आवश्यक कौशल्ये याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी SOPAN व सुविधा कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन यांच्या कामाचे कौतुक करून महाविद्यालयाचा या संस्थेशी सामंजस्य करार करून आभार मानले.