पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी रिक्षांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, युनिफॉर्म नसणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.स्वारगेट वाहतूक विभागाने ही मोहीम स्वारगेट जेधे चौक, स्वारगेट बसस्थानकाचे इनगेट-आउटगेट तसेच स्वारगेट महामेट्रो परिसरात राबवली.
10 मार्च 2026 रोजीच्या कारवाईत एकूण 146 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 111 रिक्षाचालकांवर कारवाई झाली, तर 32 जणांवर भाडे नाकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच 3 फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, 12 मार्च 2026 रोजी स्वारगेट वाहतूक विभाग आणि पुणे आरटीओ यांच्या संयुक्त कारवाईत 186 केसेस नोंदवण्यात आल्या. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या 92 रिक्षा, भाडे नाकारणाऱ्या 21, युनिफॉर्म नसलेल्या 48 आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 18 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय 7 फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या. तर पुणे आरटीओकडूनही 43 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.
या संयुक्त मोहिमेत एकूण 375 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकारी एपीआय शोभा क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने केली.पुणे शहर वाहतूक शाखेने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.