सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय : लक्ष्मण हाके
  • गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
  • सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
  • गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
 जिल्हा

शेतकऱ्याच्या घरावरच ‘ब्रिज’चा डंख! अल्फकॉन्सच्या मनमानीवर संताप; तहसील कार्यालयाने दिले चौकशीचे आदेश

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    16-03-2026 16:03:08

उरण : विकासाच्या नावाखाली कंपन्यांची मनमानी किती वाढली आहे याचे धक्कादायक उदाहरण करंजा सातघर येथे समोर आले आहे. शेतकऱ्याच्या घराशेजारी परवानगीशिवाय ब्रिजचे काम सुरू केल्याचा गंभीर आरोप अल्फकॉन्स कंपनीवर करण्यात आला असून या प्रकारामुळे नऊ जणांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

करंजा सातघर येथील श्रीमती आशा कमळाकर थळी (घर क्र. २३४४, सर्वे नं. १६) यांच्या घराशेजारी अल्फकॉन्स कंपनीकडून ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र घरमालकाची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केल्याने थळी कुटुंब धास्तावले आहे. या घरात एकूण नऊ जणांचे कुटुंब वास्तव्यास असून ब्रिजच्या कामामुळे घराला तसेच कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या संदर्भात ११ मार्च २०२६ रोजी आशा थळी यांनी उरण तहसील कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ब्रिजच्या कामामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास काही धोका झाल्यास अल्फकॉन्स कंपनी, संबंधित अधिकारी, वन विभाग तसेच ग्रामपंचायत जबाबदार राहतील.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत उरण तहसील कार्यालयाने मंडळ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकार अभिलेखांची तपासणी करून, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तसेच शासनाचे कायदे, नियम व प्रचलित धोरणांच्या आधारे सखोल चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निवासी नायब तहसीलदार महेश पाटील यांनी लेखी निर्देश दिले आहेत.

ग्रामस्थांचे म्हणणे असे की, यापूर्वी जसखार गावाजवळून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे जागृत देवस्थान श्री रत्नेश्वरी देवी मंदिर आणि ग्रामस्थांची घरे बाधित होत असल्याने पुलाची जागा बदलण्यात आली होती. त्यामुळे त्याच धर्तीवर करंजा येथील पुलाचे नियोजन बदलून उभारणी करण्यात यावी, अशी मागणी थळी कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या घरावरच बुलडोझर चालवण्याचा उद्योग थांबवावा” अशी जोरदार मागणी आता उरण तालुक्यातून होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती