मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या माध्यमातून मुंबईतील नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पुनर्वसन घरांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमातदेवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंगल प्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, राहुल नार्वेकर आणि नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भाषणांमुळे वातावरण रंगले.
चाळीतून टॉवरमध्ये – शिंदेंचा उल्लेख
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अनेक वर्षे चाळीत राहणाऱ्या कुटुंबांना आता आधुनिक टॉवरमधील घरांचा लाभ मिळत आहे. या प्रकल्पाची सुरुवात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती, मात्र मधल्या काळात प्रकल्पाचा वेग कमी झाला होता. 2022 नंतर पुन्हा गती देत काम पुढे नेण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.ते म्हणाले की, गुढीपाडव्याच्या सणापासून अनेक कुटुंबांना नव्या घरात प्रवेश करता येईल. चाळीत राहणाऱ्या लोकांना आता पुनर्विकासातून मिळालेल्या 2 बीएचके घरांचा अभिमानाने उल्लेख करता येईल, असेही त्यांनी सांगितले.शिंदे यांनी पुढे म्हटले की, म्हाडा या प्रकल्पातील इमारतींची १२ वर्षे देखभाल करणार असल्याने रहिवाशांना अतिरिक्त ताण येणार नाही.
कोळंबकरांना सर्वाधिक टाळ्या – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांचा विशेष उल्लेख केला. प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसला असून, कार्यक्रमात त्यांनाच सर्वाधिक टाळ्या मिळाल्या, असे त्यांनी सांगितले.फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळ परिसरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा विषय अनेक वर्षे प्रलंबित होता. अखेर हा प्रकल्प खासगी बिल्डरकडे न देता म्हाडाच बिल्डर म्हणून काम करेल, असा निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प मार्गी लागला.
2029 पर्यंत सर्वांना घर
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पात देशातील अग्रगण्य बांधकाम कंपन्यांची मदत घेण्यात आली. अनेक अडचणींवर मात करत काम पुढे नेले असून 2029 पर्यंत सर्व पात्र रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.