उरण : फ्रेंड्स ऑफ नेचर (FON) – सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था, चिरनेर, उरण, रायगड, महाराष्ट्र या संस्थेचा २० वा वर्धापन दिन अत्यंत साध्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या दोन दशकांपासून संस्था वन्यजीव संरक्षण, सर्परक्षण, जनजागृती, वन्यजीव बचाव व पुनर्वसन, वृक्षलागवड व संवर्धन तसेच वन्यजीव व निसर्गावर शास्त्रीय अभ्यास या माध्यमातून निसर्गसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करत आहे.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी १० वाजता संस्थेच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी संस्थेच्या मागील वर्षातील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील कामांची आखणी याची माहिती सर्वांना देण्यात आली. त्यानंतर नवीन व जुन्या सदस्यांची ओळख करून देण्यात आली. तसेच संस्थेच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा, त्यामधील सुधारणा आणि पुढील कार्यवाही याबाबत सदस्यांसोबत सखोल विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीत संस्थेच्या निसर्गसंवर्धन व जनजागृती कार्यक्रमांसाठी आर्थिक नियोजन तसेच दानशूर दाते व निसर्गप्रेमींकडून संस्थेच्या स्नेक बाईट इमर्जन्सी फंड आणि वाइल्डलाईफ केअर फंडसाठी मदत गोळा करण्याबाबत चर्चा करण्यात आली, जेणेकरून जे सर्पदंश पीडित रुग्ण सर्पदंशातील इलाजाचा खर्च करू शकत नाहीत किंवा जखमी किंवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तातडीने मदत करता येईल.
यावेळी फॉन संस्थेच्या नामफलकाला निवृत्त शासकीय अधिकारी श्रीधर (बापू) मोकल व जीटीपीएस बोकडविरा येथील तंत्रज्ञ श्री. रामकृष्ण कारंडे या संस्थेच्या नव सदस्यांच्या शुभहस्ते हार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभली. विशेषतः संस्थेची नेक्स्ट जनरेशन कुमारी सृष्टी,कुमार रुद्र, व देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होती.
गेल्या २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून संस्थेने २१ व्या वर्षात पदार्पण केले असून निसर्ग व वन्यजीव संवर्धनाचा ध्यास आणि श्वास जपण्याची शपथ यावेळी सर्व फॉन सदस्यांनी घेतली. आजपर्यंत संस्थेची यशस्वी वाटचाल ही केवळ संस्थेचे स्वयंसेवक किंवा संस्थेची नसून वन विभाग, स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमी यांच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळेच शक्य झाली, अशी कृतज्ञता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत रामदास ठाकूर यांनी व्यक्त केली.यापुढे २१ व्या वर्षात पदार्पण करताना वन्यजीव संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.