अफगाणिस्तान :अफगाणिस्तान मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, काबूल येथे झालेल्या हवाई हल्ल्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तालिबान प्रशासनाने पाकिस्तान वर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, निवासी भागांसह एका रुग्णालयावर बॉम्बहल्ला करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे 400 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
तालिबान सरकारचे प्रवक्ते हमदुल्लाह फितरत यांनी सांगितले की, रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले. बचाव पथके अजूनही ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दुसरे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनीही या घटनेचा निषेध करत, हा हल्ला देशाच्या सार्वभौमत्वावर आघात असल्याचे म्हटले आहे.
मात्र, पाकिस्तानकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही नागरी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही. हवाई कारवाई केवळ दहशतवादी ठिकाणांवरच करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद नेही या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करत, अफगाणिस्तानमधील सत्ताधाऱ्यांना दहशतवादाविरुद्ध ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सारखे गट अफगाणिस्तानातून कारवाया करत आहेत.
या घटनेनंतर काबूलमध्ये बचावकार्य वेगाने सुरू असून, जखमींवर उपचार केले जात आहेत. मात्र, नेमके लक्ष्य काय होते आणि हल्ल्याची खरी परिस्थिती काय आहे, याबाबत दोन्ही देशांमध्ये परस्परविरोधी दावे समोर येत असल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.सध्या या घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.