इराण : मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षात मोठी घडामोड समोर आली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची पुष्टी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने केली आहे.
या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलमधील तेल अवीव येथे १०० हून अधिक ठिकाणी क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. लारीजानी, त्यांचा मुलगा आणि बसिज दलाचे कमांडर गुलामरेझा सोलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.इराणने असा दावा केला आहे की, इस्रायलची संरक्षण व्यवस्था हे हल्ले पूर्णपणे थांबवू शकली नाही. दरम्यान, इस्रायलकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्रांच्या अवशेषांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कोण होते अली लारीजानी?
अली लारीजानी हे इराणमधील अत्यंत प्रभावशाली नेते मानले जात होते. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सत्ताकारणात त्यांचा प्रभाव अधिक वाढला होता. ते इराणच्या सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत होते.त्यांचा जन्म ३ जून १९५८ रोजी नजफ येथे झाला. त्यांचे कुटुंब धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली होते. ‘टाईम’ मासिकाने त्यांना “इराणचे केनेडी” अशी उपमा दिली होती.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर आक्रमक भूमिका
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर लारीजानी अधिक कठोर आणि आक्रमक भूमिकेत दिसू लागले. त्यांनी संक्रमण काळात स्थापन करण्यात आलेल्या नेतृत्व गटात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.अमेरिका आणि इस्रायलविरोधात त्यांनी तीव्र इशारे दिले होते, ज्यामुळे तणाव आणखी वाढला.
शिक्षण आणि कारकीर्द
लारीजानी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी इतर इराणी नेत्यांपेक्षा वेगळी होती. त्यांनी शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी मधून गणित व संगणक विज्ञानात पदवी घेतली, तर तेहरान विद्यापीठ येथून तत्त्वज्ञानात उच्च शिक्षण पूर्ण केले.१९७९ च्या इराणी इस्लामिक क्रांती नंतर त्यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स मध्ये प्रवेश केला. पुढे त्यांनी सांस्कृतिक मंत्री, सरकारी प्रसारण संस्थेचे प्रमुख आणि २००८ ते २०२० दरम्यान इराणच्या संसदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
अणुकरार आणि राजकीय प्रवास
ते २००५ ते २००७ दरम्यान इराणचे मुख्य अणु वाटाघाटीकार होते. २०१५ मधील अणुकराराला संसदेची मंजुरी मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र गार्डियन कौन्सिल कडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. २०२५ मध्ये त्यांची पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.या ताज्या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली असून, पुढील काही दिवसांत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.